Home क्राईम जळगाव तालुका पोलिसांची मोठी कामगिरी; १० गुन्ह्यांचा छडा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव तालुका पोलिसांची मोठी कामगिरी; १० गुन्ह्यांचा छडा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने परिसरात वाढलेल्या घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत लक्षणीय यश मिळवले आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या काही दिवसांत तब्बल १० गुन्ह्यांची उकल केली आहे. या धडक मोहिमेत ५ अट्टल आरोपींना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून ४ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत होती, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले होते. या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्हेगारांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तातडीने विशेष पथके तयार केली. या पथकांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने तपासून संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.

या सखोल तपासादरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये टोळीचा मुख्य म्होरक्या गुरुजीत सिंग सुजनसिंग बावरी (वय २६, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव), दीपक बापू पाटील (वय २५, रा. पंचशील नगर, तांबापुरा, जळगाव), राजेश माणिक राठोड (वय २४, रा. तांबापुरा, जळगाव), सुमित संजय कोळी (वय १९, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) आणि महेश उर्फ संतोष भोई (वय २४, रा. तांबापुरा, जळगाव) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या खाकी इंगा दाखवताच आणि कसून चौकशी केल्यानंतर या पाचही जणांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या एकूण १० गुन्ह्यांची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यांमध्ये ९ घरफोडी आणि १ मोटारसायकल चोरीच्या घटनेचा समावेश आहे.. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी घरफोडीतील सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचे दागिने व इतर वस्तू, तसेच २ लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, या टोळीने इतर भागातही काही गुन्हे केले आहेत का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या यशस्वी कारवाईनंतर पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, घराबाहेर जाताना किंवा घर बंद ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. गुन्हेगारीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया भविष्यातही अविरतपणे सुरू राहतील, असा ठाम विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजीता येङले, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोलीस नाईक कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दीपक देवरे आणि वाहन चालक पोलीस हवालदार अशोक पाटील व पंकज देशमुख यांच्या पथकाने बजावली आहे.


Protected Content

Play sound