Home Cities जळगाव व. वा. वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त साहित्यिकांचा प्रेरणादायी संवाद

व. वा. वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त साहित्यिकांचा प्रेरणादायी संवाद

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील ऐतिहासिक व. वा. वाचनालयाच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात साहित्यविश्वातील दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांची प्रकट मुलाखत रंगली. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजीव बाविस्कर आणि भा. रा. तांबे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित कवी अशोक कोतवाल यांनी आपल्या साहित्यप्रवासातील अनुभव, संघर्ष आणि लेखनाच्या प्रेरणा रसिकांसमोर उलगडल्या. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुलकर्णी यांनी घेतलेल्या या बहारदार मुलाखतीला उपस्थित साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमादरम्यान राजीव बाविस्कर यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा देताना, “मी एक सर्वसाधारण विद्यार्थी होतो. मात्र, माझ्या चित्रांमुळे संपूर्ण शाळा आणि गाव मला ओळखू लागले. आयुष्यात जे अनुभवले, तेच मी माझ्या पुस्तकांमधून मांडले,” असे सांगितले. त्यांच्या या मनोगताला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. संघर्षातून उभा राहिलेला साहित्यप्रवास आणि वास्तवाशी जोडलेले लेखन याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. कवी अशोक कोतवाल यांनीही आपल्या कवितेच्या आणि साहित्यनिर्मितीच्या प्रवासातील अनेक अनुभव सांगत साहित्य हे समाजाशी जोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद केले. त्यांच्या ओघवत्या आणि संवेदनशील संवादामुळे सभागृहातील रसिक भारावून गेले. साहित्यिकांनी मांडलेल्या विचारांमुळे नवोदित लेखक आणि विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली.

या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल शहा यांनी प्रास्ताविकातून व. वा. वाचनालयाच्या दीडशे वर्षांच्या वैभवशाली वाटचालीचा आढावा घेत, वाचन संस्कृती जपण्यासाठी वाचनालयाच्या योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शुभदा कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अपर्णा भट-कासार यांनी केले. या ऐतिहासिक सोहळ्याला शहरातील साहित्यप्रेमी, वाचक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Protected Content

Play sound