Home आरोग्य ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिंगरोडवरील अरुश्री हॉस्पिटल येथे आयोजित या शिबिरात शहरातील ३८ कलावंतांची विविध वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक औषधांचेही मोफत वितरण करण्यात आले.

मंगळवार (दि. ३०) रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे आयोजन स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आले होते. कलावंतांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला अरुश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालिका डॉ. स्वाती बाविस्कर यांच्या विशेष सहकार्याने यशस्वी स्वरूप प्राप्त झाले. या उपक्रमासाठी मुक्ती फाऊंडेशन, जळगावचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराज पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अरुश्री हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. स्वाती बाविस्कर, मुक्ती फाऊंडेशनचे मुकुंद गोसावी, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार-गुजराथी, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर डॉ. स्वाती बाविस्कर यांनी उपस्थित कलावंतांना आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व तसेच औषधांचा योग्य वापर आणि उपचारादरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. कलावंतांनी व्यस्त दिनचर्येमध्येही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असा संदेश त्यांनी दिला. शिबिरात डॉ. स्वाती बाविस्कर, डॉ. हर्ष चौधरी, राहुल बनसोडे तसेच अरुश्री हॉस्पिटलच्या आरोग्यसेवकांनी सहभागी कलावंतांची सीबीसी रक्त तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, रक्तदाब मोजणी, ईसीजीसह विविध वैद्यकीय तपासण्या केल्या. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरणही करण्यात आले. या उपक्रमामुळे कलावंतांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आरोग्यसेवेचा लाभ विनामूल्य मिळाला.

या शिबिराचा शहरातील ३८ कलावंतांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक महाजन, मोहित पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, दर्शन गुजराथी, राहुल पवार यांच्यासह बालरंगभूमी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतीला अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरामुळे कलावंतांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम भविष्यातही अशाच स्वरूपात सुरू राहावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound