Home प्रशासन नगरपालिका भुसावळ पाणीटंचाईवर रिपब्लिकन सेनेचा एल्गार ; नगरपरिषदेसमोर मडकी फोडून तीव्र आंदोलन

भुसावळ पाणीटंचाईवर रिपब्लिकन सेनेचा एल्गार ; नगरपरिषदेसमोर मडकी फोडून तीव्र आंदोलन

0
5


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर रिपब्लिकन सेनेने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत नगरपरिषद कार्यालयासमोर मडकी फोडून तीव्र आंदोलन केले. शहरातील नागरिकांना नियोजनबद्ध व पारदर्शक पाणीपुरवठा व्हावा यासाठी तात्काळ अधिकृत पाणीपुरवठा रोस्टर जाहीर करावे, तसेच पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

रिपब्लिकन सेनेच्या वतीने दोन दिवसांपूर्वीच नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आंदोलनाची पूर्वकल्पना असूनही मुख्याधिकारी किंवा पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आंदोलनस्थळी उपस्थित राहिले नाहीत किंवा आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला नाही, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केला. प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासन उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही. परिणामी नागरिकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत असून अनेक कुटुंबांना रोजगार आणि दैनंदिन कामे बाजूला ठेवून पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यामुळे आर्थिक तसेच मानसिक ताण वाढला असून शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर तापी व पूर्णा नदीला पूर आला असून शेळगाव बॅरेज पुन्हा पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक जलस्रोत उपलब्ध झाला असतानाही प्रशासनाने अद्याप अधिकृत रोस्टर किंवा ठोस नियोजन जाहीर केले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. योग्य नियोजन केले असते तर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला असता, असा दावा त्यांनी केला. रिपब्लिकन सेनेने तापी नदीपात्रातून भुसावळकरांच्या हक्काचे हजारो लिटर पाणी बीएन अग्रवाल कंपनीकडून अनधिकृतपणे उपसा केल्याचा आरोपही केला. या प्रकरणाचा पुराव्यानिशी पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांचे अभिनंदन करत उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असताना सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

नगरपरिषद दरवर्षी जळगाव पाटबंधारे विभागाकडे लाखो रुपयांचा जलकर भरत असल्याने शेळगाव बॅरेजमधून पाणी उचलण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. योग्य वेळी तात्पुरती पाइपलाइन उभारून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविण्याची कार्यवाही झाली असती, तर आज शहरावर ही पाणीटंचाईची वेळ आली नसती, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याशिवाय जलशुद्धीकरणासाठी आवश्यक असलेले आलम, जेली आणि इतर रसायनांचा साठा संपत आल्याची माहिती समोर येत असल्याने नागरिकांना गढूळ व अस्वच्छ पाणीपुरवठा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून त्याकडे दुर्लक्ष करणे अयोग्य असल्याचे रिपब्लिकन सेनेने स्पष्ट केले.

यावेळी रिपब्लिकन सेनेने शहराचा अधिकृत पाणीपुरवठा रोस्टर तातडीने जाहीर करणे, अमृत योजनेची रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे, शेळगाव बॅरेजमधून पाणी उचलण्याची व्यवस्था तातडीने सुरू करणे, जलशुद्धीकरणासाठी आवश्यक रसायनांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, पाणीप्रश्नावर नगरपरिषदेची विशेष सभा बोलावणे आणि नागरिकांना दररोज अधिकृत माहिती देण्याची मागणी केली. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, वंदनाताई इराक, लिलाधर सपकाळे, देवदत्त मकासरे, मिना भालेराव, उर्मिला तायडे, गणेश जाधव, स्वप्निल सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound