


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या महत्त्वाच्या जनहिताच्या प्रश्नांना महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा वाचा फोडण्यात आली. जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे व्यापारी गाळेधारक, फेरीवाले, हातगाडीधारक तसेच महानगरपालिका नोकरभरतीचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या द्वितीय पावसाळी अधिवेशन (जून–जुलै २०२६) दरम्यान आमदार राजूमामा यांनी जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील तब्बल २,३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सभागृहात सांगितले. सन २०१२ पासून रेडीरेकनर दर निश्चितीच्या प्रक्रियेमुळे हा प्रश्न रखडला असून हजारो व्यापाऱ्यांच्या उपजीविकेवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेला आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते, तसेच नगरविकास विभागानेही त्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले होते. मात्र, अद्याप महानगरपालिकेकडून प्रस्ताव शासनाकडे सादर न झाल्याने व्यापाऱ्यांना न्याय मिळू शकलेला नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. हा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवून गाळेधारकांचा प्रश्न निकाली काढण्याची त्यांनी जोरदार मागणी केली. राजूमामा यांनी जळगाव शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक आणि लघु व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही सभागृहात उपस्थित केला. शहरात फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण व नोंदणी तसेच नियोजित व्हेंडिंग झोन विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय जळगाव महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदांमुळे नागरी सुविधा आणि विकासकामांवर परिणाम होत असल्याचे सांगत त्यांनी तातडीने नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास शहरातील विविध विकास प्रकल्पांना गती मिळेल आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सभागृहात उपस्थित केलेले हे सर्व प्रश्न जळगाव शहरातील व्यापारी, फेरीवाले, हातगाडीधारक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याचे सांगत, हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याची ग्वाही आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी दिली.



