Home Cities जळगाव कापूस शेती वाचविण्यासाठी ४८ गावांतील शेतकरी महिलांचे विशेष प्रशिक्षण; एल निनोवर मात...

कापूस शेती वाचविण्यासाठी ४८ गावांतील शेतकरी महिलांचे विशेष प्रशिक्षण; एल निनोवर मात करण्याची तयारी

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाण्याचा कार्यक्षम आणि शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रायमार्क कापूस प्रकल्पांतर्गत जळगाव येथे ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ (ToT) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील शेतकरी महिलांना आधुनिक जलव्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षित महिला आता आपल्या गावांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत.

जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात यंदाच्या संभाव्य एल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून कापूस पिकासाठी पाण्याचे नियोजन, बचत आणि कार्यक्षम वापर यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, यासाठी विविध तांत्रिक बाबींची माहिती सहभागी महिलांना देण्यात आली.

प्रशिक्षणामध्ये कापूस पिकासाठी एक सरी आड सिंचन पद्धतीचा अवलंब, माती व वनस्पतींच्या निर्देशकांच्या आधारे सिंचनाचे योग्य वेळापत्रक निश्चित करणे, सूर्यफूलाच्या संकेतांचा वापर, पानांवरील सुकण्याची लक्षणे ओळखून पाणी देण्याचे नियोजन, ठिबक सिंचन आणि मल्चिंगचा संयुक्त वापर करून पाण्याची बचत करणे, तसेच अतिरिक्त पावसाचे पाणी साठवून जलसंधारण करण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षणासाठी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक प्रा. निलेश भागवत यांनी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी बदलत्या हवामानामुळे शेतीसमोरील आव्हाने स्पष्ट करत, वैज्ञानिक जलव्यवस्थापनामुळे कापूस उत्पादन टिकवून ठेवता येते, उत्पादन खर्च कमी होतो आणि उपलब्ध पाण्याचा अधिक परिणामकारक वापर करता येतो, असे सांगितले.

कार्यक्रमाला सेवा फाउंडेशनचे प्रतिनिधी, प्रशिक्षक तसेच विविध गावांतील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या माध्यमातून हवामान बदलाशी सुसंगत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन शाश्वत कापूस उत्पादनाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढले असून, महिला प्रशिक्षकांच्या माध्यमातून गावागावात जलसंवर्धन आणि वैज्ञानिक शेतीचा संदेश पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.


Protected Content

Play sound