


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात साकारत असलेल्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विभागीय क्रीडा संकुल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. मेहरूण येथील सर्व्हे क्रमांक ३४३ मध्ये उभारल्या जाणाऱ्या या क्रीडा संकुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विद्यमान रस्ता क्रीडा संकुलाच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
राज्याचे मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या पुढाकारातून जळगाव शहरासाठी अत्याधुनिक विभागीय क्रीडा संकुल उभारले जात असून या प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, क्रीडा संकुलाकडे जाणारा सध्याचा रस्ता कच्चा आणि वहिवाटीचा असल्याने भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता प्रशस्त रस्त्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. यावेळी महापौर दिपमाला काळे, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, प्रांताधिकारी विनय गोसावी, महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले, नगररचना विभागाचे अमोल पाटील तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी सध्याच्या रस्त्याची स्थिती, वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक बदल आणि क्रीडा संकुलासाठी भविष्यातील प्रवेशमार्गाची आवश्यकता याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी विभागीय आयुक्तांनी सध्या प्रत्यक्ष वापरात असलेला विद्यमान रस्ताच विभागीय क्रीडा संकुलासाठी अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यासंदर्भात जळगाव महानगरपालिका, नगररचना विभाग आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने आणि प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
प्रशस्त आणि सक्षम रस्त्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक, प्रेक्षक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच भविष्यात या परिसरातील वाहतूक व्यवस्थाही अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडूनही या कामाला गती देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. एकूणच, जळगाव शहराच्या क्रीडा विकासाला नवी दिशा देणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, विद्यमान रस्ता अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.



