


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी विधानसभेत हा गंभीर मुद्दा उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. संस्थानचे झालेले मोठे आर्थिक नुकसान, भाविकांच्या श्रद्धेचा विचार आणि आगामी आषाढी उत्सव लक्षात घेता मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तातडीने प्रस्ताव शासनाकडे मागविण्याची मागणी त्यांनी केली.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे बोलताना आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, अमळनेरमधील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे उत्तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे श्रद्धास्थान असून ते ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. सुमारे २५० वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थानचे गादीपती संत सखाराम महाराज वर्षभर महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा झेंडा घेऊन धार्मिक जनजागृतीचे कार्य करतात. त्यामुळे या संस्थानाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अत्यंत मोठे असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. आमदार पाटील यांनी सांगितले की, १ जुलैच्या रात्री मंदिर परिसरात भीषण आग लागून गाभाऱ्याशी संबंधित सुमारे अडीचशे वर्षांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जळून खाक झाला. या दुर्घटनेत मंदिरातील मूर्ती आणि मुख्य देवस्थान सुरक्षित राहिले असले तरी गाभाऱ्यातील प्राचीन वैभवाचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत १५ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, या घटनेनंतर मंदिर काही दिवसांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होणार असून, त्या काळात अमळनेरच्या वाडी संस्थानात हजारो वारकरी आणि भाविक विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिराचे पुनरुज्जीवन आणि आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मंदिराच्या संरचनेचे स्ट्रक्चरल ऑडिट त्वरित पूर्ण करून त्यानंतर पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून या संस्थानाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यासाठी शासनाने तातडीने प्रस्ताव मागवावा, अशी मागणी त्यांनी केली. मंदिराशी लाखो भाविकांच्या भावना जोडलेल्या असून वारकरी संप्रदायासाठी या संस्थानाला विशेष स्थान आहे. त्यामुळे केवळ आर्थिक नुकसान भरून काढणे नव्हे, तर या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचे जतन करण्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी अपेक्षाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली.



