Home आरोग्य बायपासनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर मात; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णाला नवजीवन

बायपासनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर मात; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णाला नवजीवन

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हृदयावरील बायपास शस्त्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या गंभीर हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्याधुनिक उपचार करत एका ५९ वर्षीय रुग्णाला नवजीवन दिले आहे. ‘एव्ही ब्लॉक’ या गंभीर हृदयविकाराचे अचूक निदान करून ड्युअल चेंबर पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे ही संपूर्ण उपचार प्रक्रिया आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णाला पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

बोदवड तालुक्यातील संजय पाटील (वय ५९) हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, काही दिवसांनी त्यांना वारंवार चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, अचानक अशक्तपणा जाणवणे तसेच हृदयाचे ठोके अत्यंत मंदावण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

प्रकृती अधिक बिघडल्याने संजय पाटील यांना पुढील उपचारांसाठी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे हृदयालयाचे विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली, डॉ. सिद्धेश्वर खांडे आणि त्यांच्या अनुभवी वैद्यकीय पथकाने रुग्णाची सखोल तपासणी केली.

रुग्णावर विविध वैद्यकीय चाचण्या आणि ईसीजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान रुग्णाला ‘एव्ही ब्लॉक’ हा गंभीर हृदयविकार असल्याचे निदान झाले. ही अशी अवस्था असते की, हृदयाच्या वरच्या आणि खालच्या कप्प्यांमधील विद्युत संदेशांचा प्रवाह मंदावतो किंवा पूर्णपणे खंडित होतो. त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित आणि अत्यंत कमी होतात. योग्य वेळी उपचार न झाल्यास बेशुद्ध पडणे, हृदयक्रिया बंद पडणे किंवा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी ड्युअल चेंबर पेसमेकर बसविण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. पेसमेकर बसवल्यानंतर रुग्णाच्या हृदयाचे ठोके नियमित झाले असून चक्कर येणे, अंधारी येणे आणि अशक्तपणासारखी सर्व लक्षणे लक्षणीयरीत्या कमी झाली आहेत. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना नवसंजीवनी मिळाल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

या उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च आयुष्मान भारत योजनेअंतर्गत करण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेमुळे गरजू रुग्णांनाही उच्च दर्जाचे आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध होत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यावेळी हृदयालयाचे विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, बायपास शस्त्रक्रियेनंतर काही रुग्णांमध्ये हृदयाच्या विद्युत वहन व्यवस्थेशी संबंधित गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अशा वेळी चक्कर येणे, हृदयाचे ठोके कमी होणे, थकवा जाणवणे किंवा बेशुद्ध पडण्यासारखी लक्षणे दिसल्यास वेळ न दवडता हृदयतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार झाल्यास गंभीर धोके सहज टाळता येतात.

 


Protected Content

Play sound