


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) आणि त्याअंतर्गत कार्यरत सहा उपकंपन्यांच्या विविध आर्थिक योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जळगाव जिल्हा व्यवस्थापक राहुल नरवडे यांनी केले आहे.
महामंडळामार्फत विविध समाजघटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक कर्ज व अनुदानाधारित योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगार, व्यवसाय विस्तार आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्याचा उद्देश असून, पात्र लाभार्थ्यांना सुलभ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या उपकंपन्यांमध्ये पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यांचा समावेश आहे. या संस्थांमार्फत संबंधित समाजघटकांसाठी विविध आर्थिक सहाय्य योजना राबविल्या जात आहेत. महामंडळाच्या योजनांमध्ये २५ टक्के बीज भांडवल कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच एक लाख रुपयांच्या थेट कर्ज योजनेचा समावेश आहे. थेट कर्ज योजनेंतर्गत संपूर्ण कर्जाची रक्कम महामंडळामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. लाभार्थ्यांनी दरमहा २,०५८ रुपयांचे ४८ समान हप्ते नियमित भरल्यास कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. मात्र, हप्ते थकित राहिल्यास वार्षिक ४ टक्के व्याजदर लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात कमाल १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाची रक्कम महामंडळामार्फत जमा केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी vnvjntdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज प्रक्रियेबाबत अथवा योजनांविषयी अधिक माहितीसाठी जळगाव जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक राहुल नरवडे यांनी केले आहे.



