


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराकडून प्रलंबित काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार जिनेंद्र प्रकाश पाटील (वय ४५ वर्षे, व्यवसाय भूकरमापक, रा. प्लॉट नं. १०२/१९, भूषण कॉलनी, जळगाव) यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या वडिलांच्या नावावरील घराच्या कागदपत्रांमध्ये झालेली नोंद दुरुस्त करून पुन्हा नाव नोंदविण्याचे काम प्रलंबित होते. यासाठी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय जळगाव येथे अर्ज करण्यात आला होता. या कामासाठी संबंधित भूकरमापकाने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
सापळा कारवाईदरम्यान आरोपी भूकरमापक जिनेंद्र प्रकाश पाटील यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार कॅम्प-जळगाव) यांनी काम पाहिले. तसेच एसीबीच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा.



