


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली असून, कामावर सातत्याने गैरहजर राहणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिले आहेत. शहर स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर दालनात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधितांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला आरोग्य अधिकारी निर्मला गायकवाड, सहाय्यक अधिकारी समीर बोरवले, सर्व स्वच्छता निरीक्षक (SI), मुख्य स्वच्छता निरीक्षक (CSI) तसेच मक्तेदारांचे सुपरवायझर उपस्थित होते. बैठकीत शहरातील दैनंदिन स्वच्छता व्यवस्था, झाडलोट, गटर सफाई, कचरा संकलन आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपमहापौर चौधरी यांनी झाडू कामगार, गटर सफाई कर्मचारी तसेच स्वच्छता विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष केंद्रित केले. वारंवार विनाकारण गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित झाडलोट, गटारींची स्वच्छता, कचरा उचलण्याची व्यवस्था आणि स्वच्छता विषयक कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे उपमहापौरांनी सांगितले. नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्पष्ट केले की, नागरिकांना दर्जेदार स्वच्छता सेवा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. स्वच्छतेच्या कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि मक्तेदारांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नियमित आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यावरही यावेळी भर देण्यात आला.



