Home धर्म-समाज भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळा’चा शुभारंभ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळा’चा शुभारंभ

0
9


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भक्ती, अध्यात्म आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भुसावळ शहरात ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ अंतर्गत कार्यरत असलेल्या वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या मंडळाचा पहिला जाहीर सुंदरकांड पठण सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत समाजात भक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी उचललेले हे पाऊल विशेष कौतुकास्पद ठरत आहे. वय हे केवळ एक आकडा असून इच्छाशक्ती आणि समर्पणाच्या जोरावर कोणतेही कार्य यशस्वी करता येते, हे या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळातील १५ ते २० ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनी नियमितपणे एकत्र येऊन सुंदरकांड पठणाचा सराव करत होते. सुंदरकांडातील श्लोक, चौपाया तसेच त्यांचे सुश्राव्य गायन याचा त्यांनी सातत्याने अभ्यास केला. अखेर या साधनेचा पहिला सार्वजनिक सोहळा आयोजित करण्यात आला.

मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळा’चा अधिकृत स्थापना दिन साजरा करण्यात आला. ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितु पाटील यांच्या निवासस्थानी मंडळाचा पहिला जाहीर सुंदरकांड पठण कार्यक्रम पार पडला. यावेळी भगवान श्रीराम आणि हनुमंताच्या भक्तीचे गुणगान करणाऱ्या सुंदरकांड पठणामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. सुंदरकांडाचे सामूहिक पठण मनाला शांती आणि शरीराला सकारात्मक ऊर्जा देणारे असल्याची भावना उपस्थित भक्तांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यावेळी भजनी मंडळाचे सदस्य सतीश जंगले, पी. जी. पाटील, गणेश सरोद, मिलिंद कोल्हे, दिलीप मराठे, प्रभाकर झांबरे, प्रमोद बोरोले, अशोक नेहते, जी. डी. सरोदे, भास्कर खाचणे, रमेश पाटील, संजीव चौधरी, संजय भारंबे, सुनील सूर्यवंशी, एच. पी. महाजन आदी उपस्थित होते. गणेश कॉलनी परिसरातील रामभक्तांनीही या मंगलमय सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक पाटील, भाग्येश चौधरी, राजेश वारके, नरेंद्र नेमाडे, वेदांत पाटील आणि तारुष ढाके, दुर्वांग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

ज्येष्ठ नागरिकांच्या या भक्तीमय उपक्रमामुळे भुसावळ शहरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, नियमित सुंदरकांड पठणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार आणि भक्तीचा प्रसार करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.

 


Protected Content

Play sound