Home क्राईम कजगावजवळ मध्यरात्री भीषण अपघात; दिंडीतील भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, एक ठार तर...

कजगावजवळ मध्यरात्री भीषण अपघात; दिंडीतील भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, एक ठार तर १५ भाविक जखमी

0
8


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कजगावजवळ सोमवारी २९ जून रोजी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. महिंदळे गावातून निघालेल्या पायी दिंडीतील भाविकांच्या ट्रॅक्टरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने एक भाविक ठार झाला असून दोन जण गंभीर तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिंदळे गावातून धार्मिक पायी दिंडी निघाली होती. या दिंडीसोबत काही भाविक ट्रॅक्टरमधून प्रवास करत होते. कजगावजवळ महामार्गावर रात्रीच्या सुमारास इंडियन गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरच्या मागील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात दिनकर शेनपडू भदाणे (वय ५५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सतिलाल नरसिंग पाटील (वय ४५), शशिकांत जगदीश पाटील (वय २६), जगदीश निंबा पाटील (वय ३५), नंदू ताकतसिंग पाटील (वय ४०), पंकज जुलाल पाटील (वय ३५), जोहरलाल नंदा पाटील (वय ६०), भगवान निंबा पाटील (वय ४४), दिलीप उदयसिंग पाटील (वय ७०), रावसाहेब बाळू पाटील (वय ४५), अमोल सुरेश पाटील (वय ३०), अविनाश लुभान पाटील (वय ४२), नथाबाई रमेश मिस्तरी (वय ५५), बाबूलाल महादू बच्छाव (वय ६०), महेश बाळकृष्ण कुलकर्णी (वय ३५), गोविंदा पांडुरंग पाटील (वय ६५) यांच्यासह भाविक जखमी झाले आहेत.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. भाविकांच्या मदतीच्या आक्रोशानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना ट्रॅक्टरमधून बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रक व ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. ट्रकचालकाची चौकशी सुरू असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या दुर्घटनेमुळे महिंदळे गावासह भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. दिंडीतील भाविकांमध्ये भीतीचे वातावरण असून मृत दिनकर भदाणे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमी भाविकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

कजगावजवळ झालेल्या या भीषण अपघातात दिंडीतील एका भाविकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताची अधिकृत माहिती लवकरच स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound