Home क्राईम कोचूर बु. येथील तरुण बेपत्ता ; अपहरणाचा संशय, सावदा पोलिसांत गुन्हा दाखल

कोचूर बु. येथील तरुण बेपत्ता ; अपहरणाचा संशय, सावदा पोलिसांत गुन्हा दाखल

0
4


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कोचूर बु. येथील २७ वर्षीय हर्षल विलास महाजन हा तरुण २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाला आहे. घरातून पानटपरीवर जाऊन येतो असे सांगून बाहेर पडलेला हर्षल त्यानंतर घरी परतला नसल्याने कुटुंबीयांकडून त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणी त्याच्या आईच्या फिर्यादीवरून सावदा पोलिसांनी अपहरणाचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी नंदाबाई विलास महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पानटपरीवर जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी परिसरातील तसेच विविध संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा कुठेही शोध लागला नाही. कुटुंबीयांकडून सर्वतोपरी शोध घेऊनही हर्षलचा ठावठिकाणा न लागल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याचे जबरदस्तीने किंवा फसवणुकीच्या मार्गाने अपहरण केले असावे, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार सावदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बेपत्ता हर्षल महाजन याचा बांधा सडपातळ असून त्याची उंची सुमारे ५ फूट ११ इंच आहे. त्याचा रंग सावळा असून चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे बारीक, केस काळे आणि कान मोठे आहेत. तो बेपत्ता होताना फुलबाहींचा पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि निळ्या रंगाच्या चपला परिधान करून घराबाहेर पडला होता. त्याच्या गळ्यात तसेच हातात दोरा बांधलेला आहे.

हर्षलकडे मोटोरोला कंपनीचा G-96 मोबाईल असून त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या मोबाईलसह उपलब्ध माहितीच्या आधारे तसेच इतर शक्य त्या दिशेने पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सावदा पोलीस स्टेशनचे सफौ विनोद बळीराम पाटील करीत आहेत. हर्षल महाजन याच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास ती तातडीने सावदा पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देण्यासाठी सावदा पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक ०२५८४-२२२०४३ किंवा तपासी अधिकारी सफौ विनोद पाटील : ९८२३८८९८९० यांच्याशी संपर्क साधता येईल.


Protected Content

Play sound