Home क्राईम चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला ; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात, पल्सर जप्त

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला ; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात, पल्सर जप्त

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने शहरात फिरत असलेल्या दोन इसमांना जिल्हापेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून विनाक्रमांकाची बजाज पल्सर मोटारसायकल जप्त केली असून, तपासादरम्यान ही मोटारसायकल शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ./३०६८ किरण पंढरीनाथ वानवडे आणि पो. कॉ./२०१७ प्रविण राजेंद्र जाधव हे जिल्हापेठ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी कांताई नाट्यगृह परिसरात दोन इसम चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची विश्वसनीय गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ कांताई नाट्यगृह परिसरात धाव घेतली. यावेळी दोन इसम विनाक्रमांकाची बजाज पल्सर मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून मोटारसायकलबाबत कागदपत्रे तसेच मालकी हक्काची माहिती विचारली. मात्र, त्यांना वाहनासंदर्भात समाधानकारक माहिती देता आली नाही. अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मनोज वत्तू चौधरी (वय २४, रा. ज्ञानदेव नगर परिसर, जुना खेडी रोड, जमुना नगर, जळगाव) आणि सुमित शंकर चौधरी (वय ३१, रा. श्रीराम चौक, हरिओम नगर, जळगाव) अशी सांगितली.

यानंतर पोलिसांनी ताब्यातील मोटारसायकलीचा चेसीस क्रमांक आणि इंजिन क्रमांकाच्या आधारे आरटीओ अॅपवरून वाहनाची माहिती तपासली. या तपासणीत मोटारसायकलीचा नोंदणी क्रमांक MH-19-DY-7458 असल्याचे समोर आले. त्यानंतर वाहनाच्या मालकाची माहिती घेऊन संबंधित मालकाशी संपर्क साधण्यात आला. चौकशीत सदर बजाज पल्सर मोटारसायकल चोरीस गेल्याचे तसेच याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ८९/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. यानंतर दोन्ही इसमांसह जप्त करण्यात आलेली चोरीची मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून कमी किमतीत किंवा संशयास्पद पद्धतीने वाहन खरेदी करण्यापूर्वी वाहनाची कागदपत्रे, नोंदणी क्रमांक, चेसीस क्रमांक आणि मालकी हक्काची खात्री करूनच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. चोरीच्या वाहनांच्या खरेदी-विक्रीबाबत अथवा संशयास्पद वाहनाबाबत माहिती मिळाल्यास ती तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावी, असेही पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.कॉ./३०६८ किरण पंढरीनाथ वानवडे आणि पो. कॉ./२०१७ प्रविण राजेंद्र जाधव यांनी ही कारवाई केली. चोरीच्या वाहनांच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सतर्कता बाळगावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound