


जळगाव- विशेष प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या निकृष्ट आणि भोंगळ कारभाराचा आणखी एक जिवंत नमुना समोर आला आहे. रावेर तालुक्यातील अहिरवाडी-केऱ्हाळे रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असतानाच पहिल्याच पावसात पुलाचा भराव पूर्णपणे वाहून गेला. काम पूर्ण होण्याआधीच पुलाची झालेली ही दुरवस्था पाहून, प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदाराच्या ‘मिलीभगत’वर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अहिरवाडी ते केऱ्हाळे दरम्यान जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ग्रामीण भागातील एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू होते. मात्र, पावसाळा सुरू होताच पहिल्याच जोरदार सरीत पुलासाठी टाकलेला मुरूम आणि भराव पत्त्याच्या बंगल्यासारखा वाहून गेला. हे दृश्य एखाद्या सिनेमातील सीनसारखे दिसत होते. तर यामुळे ठेकेदाराच्या कामाबाबत आणि प्रशासनाच्या त्याच्यावरील वरदहस्ताबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
या निकृष्ट कामामुळे आता जि.प. बांधकाम विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामावर नियंत्रण ठेवणारे शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांच्यात आर्थिक मिलीभगत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “बांधकामाचे इस्टिमेट, वापरलेले साहित्य याची गुणवत्ता कोणी तपासली? अभियंत्यांनी जागेवर भेट दिली की फक्त कागदावरच घोडे नाचवले?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, “काम सुरू असतानाच पहिल्याच पावसात भराव खचणे म्हणजे कामातील हलगर्जीपणा स्पष्ट करतो. हा पूल अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. जर उद्या यावरून वाहतूक सुरू झाली आणि असाच पाऊस आला, तर मोठ्या अनर्थाची शक्यता असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे.
हा रस्ता शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी मुख्य मार्ग आहे. पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटण्याची भीती आहे. यामुळे शेतमाल बाजारात नेणे, मुलांचे शाळेत जाणे आणि आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणे कठीण होणार आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्याआधी आणि चौकशी झाल्याशिवाय याचे बिल पास करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) तात्काळ दखल घेऊन जागेवर पाहणी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यात प्रामुख्याने संबंधित शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता आणि ठेकेदाराची कसून चौकशी व्हावी. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत (Blacklist) टाकावे. पुलाचे काम दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने पुन्हा करून घ्यावे. आणि इस्टिमेटप्रमाणे काम झाले आहे की नाही, याची तांत्रिक तपासणी व्हावी या मागण्या करण्यात येत आहेत.
पहिल्याच पावसात भराव वाहून जाणे ही भविष्यातील मोठ्या दुर्घटनेची घंटा आहे. यामुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेने केवळ कागदावर विकास न दाखवता प्रत्यक्षात दर्जेदार काम करावे, अन्यथा हा ‘भोंगळ कारभार’ जनतेच्या जिवावर बेतू शकतो. आता मुख्य कार्यकारी अधिकारी यावर काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



