


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रायपूर येथील वाघुर धरण परिसरात शेती पाहणीसाठी गेलेल्या उपसरपंच वसंत लंके यांना शेताजवळील पाण्याच्या शोधात अडकलेली एक जखमी नीलगाय आढळून आली. ही घटना संध्याकाळच्या सुमारास घडली असून तत्काळ दाखवलेल्या सतर्कतेमुळे वन्यजीवाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. ग्रामस्थ, वनविभाग आणि स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नातून नीलगायला सुरक्षितपणे बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले.
घटनेबाबत माहिती देताना उपसरपंच वसंत लंके यांनी सांगितले की, ते नेहमीप्रमाणे शेताची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांना नीलगाय चारीमध्ये जखमी अवस्थेत अडकलेली दिसली. तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करत त्यांनी वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे मदत मिळण्यात काही वेळ लागला. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींमार्फत चंद्रशेखर नेवे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, कंडारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. वनविभाग व ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून जखमी नीलगायला अत्यंत काळजीपूर्वक चारीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर प्राथमिक तपासणी करून तिला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. आवश्यक असल्यास पशुवैद्यकीय उपचारही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी वेळेवर दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे. अशा घटनांमध्ये तातडीने प्रशासनाशी संपर्क साधणे आणि वन्यजीवांना मदत करणे आवश्यक असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.



