Home क्राईम कृषी मित्र भरती परीक्षेत मोठा गोंधळ ; मानधनाऐवजी प्रॉडक्ट विक्रीचा प्रस्ताव, विद्यार्थ्यांचा...

कृषी मित्र भरती परीक्षेत मोठा गोंधळ ; मानधनाऐवजी प्रॉडक्ट विक्रीचा प्रस्ताव, विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महात्मा फुले कृषी विकास केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत कृषी मित्र या पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान जळगाव शहरातील एका मोठ्या महाविद्यालयात मोठा गोंधळ निर्माण झाला. सहा महाराष्ट्रभर राबविण्यात आलेल्या या परीक्षेसाठी जिल्हाभरातून आलेल्या ३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. मात्र परीक्षा प्रक्रियेत अचानक झालेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत परीक्षा देण्यास नकार दिला.

परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आरोप केला की, त्यांना योग्य पद्धतीने हॉल तिकीट देण्यात आले नाही. तसेच भरती प्रक्रियेत सुरुवातीला सांगितलेले २५ हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासनही नाकारण्यात आले. त्याऐवजी त्यांना कृषी संबंधित प्रॉडक्ट देऊन ते विक्री करून कमिशन मिळेल, अशी अट ठेवण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी गोंधळ घालत परीक्षा प्रक्रियेला विरोध केला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी आणि तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनीही महाविद्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.

यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संबंधित प्रॉडक्ट आणि कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. जर ती बनावट आढळली, तर संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल. मात्र विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यास, त्यांनी स्वतंत्रपणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून आपले पैसे परत मिळावेत आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर अनेक विद्यार्थी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असून, संबंधित कंपनीचे काही समन्वयक (कोऑर्डिनेटर) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे.


Protected Content

Play sound