पाचोरा प्रतिनिधी । भाजपच्या लोकप्रतिनिधींना जनहिताची जराही कळकळ नसल्यामुळे आजच्या आमसभेकडे पाठ फिरवण्याचे पाप केल्याचा आरोप आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केला आहे.
येथील राजीव गांधी टाउन हॉल मध्ये आज बहुप्रतिक्षित आमसभेचे आयोजन करण्यात आले. या सभेसाठी पंचायत समितीतर्फे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, खासदार ए.टी.नाना पाटील यांच्यासह पक्षाचे दोन जिल्हा परिषद सदस्य, दोन नगरसेवक, पंचायत समिती आणि बाजार समितीचे सभापती आदींना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र यापैकी एकाही लोकप्रतिनिधीने आमसभेला हजेरी लावली नाही. यामुळे आमसभेतच तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत मुद्दा उपस्थित केला असता आमदार किशोरआप्पा पाटील यांनी हा मुद्दा खरा असल्याचे सांगितले. भाजपला जनहिताची कळकळ नसल्यामुळे त्यांनी या आमसभेकडे पाठ फिरवल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. तर काँग्रेसचे नेते अॅड. अभय पाटील यांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध केला.
पाचोरा तालुक्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमधील वैर सर्वश्रुत आहे. मात्र आमसभेत कोणतेही राजकीय जोडे न घालता जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याची नामी संधी भाजप नेत्यांनी घालवली. खासदार ए.टी. नाना पाटील हे आज सकाळी सचखंड एक्सप्रेसचे स्वागत करण्यासाठी पाचोरा येथे उपस्थित होते. मात्र त्यांना आमसभेला उपस्थिती लावणे महत्वाचे वाटले नसल्याकडे आमदार किशोरआप्पा यांनी लक्ष वेधून घेतले. भाजप हा पक्ष जनतेपासून दूर गेल्याची टीका त्यांनी केली आहे.