


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासांत छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक केली असून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या जलद व प्रभावी कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
दिनांक २५ जून २०२६ रोजी रात्री १० वाजता ते २६ जून सकाळी ७ वाजेच्या दरम्यान शिवाजीनगर भगतसिंग चौक येथील घर क्रमांक १९६ येथे ही घरफोडी झाली होती. फिर्यादी सुशील भाईलाल भावसार (वय ६१, व्यवसाय गॅरेज) यांच्या घरातून एकूण ६३,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. यामध्ये डेल कंपनीचा लॅपटॉप, सॅमसंग व नोकिया कंपनीचे मोबाईल फोन, पितळी कळशी तसेच रोख रक्कम यांचा समावेश होता. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली विशेष गुन्हे शोध पथक तयार करून तपासाला गती देण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार संशयित आरोपी राफत शेख फिरोज (वय २०, रा. गेंदालाल मिल) आणि शेख शारीम शेख मुसेफ उर्फ मुसाब (वय २०, रा. शिवाजीनगर हुडको) यांचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या घरातून दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन, पितळी कळशी आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण कारवाई अवघ्या ५ तासांत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या कारवाईत सफौ. सुनिल पाटील, दिपक शिरसाट, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतिष पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोकॉ अमोल ठाकुर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार व पोका भगवान मोरे यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.



