


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्याने आपल्या आई, शिक्षक आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत १०० विद्यार्थ्यांना शालेय दप्तर मोफत वाटप करून एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे.
राहुल मधुकर कुंभार हा मंगरूळ शाळेचा माजी विद्यार्थी असून सध्या तो यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. शालेय जीवनात मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि आईच्या त्यागामुळेच आज मी या टप्प्यावर पोहोचलो आहे, अशी भावना व्यक्त करत त्याने आपल्या आई वजाबाई कुंभार यांच्या नावाने विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले. शैक्षणिक सुविधा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि समाजात समानता निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी बोलताना राहुल कुंभार यांनी सांगितले की, आई ही प्रत्येकाच्या आयुष्याची पहिली गुरू असते, तर शिक्षक हे जीवनाला दिशा देणारे आधारस्तंभ असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी व्यावसायिक जीवनात यश मिळवू शकलो असून त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी दाते राहुल मधुकर कुंभार यांचा सत्कार केला, तर संस्थाचालक पियुषा पाटील यांनी त्यांच्या आई वजाबाई कुंभार यांचा गौरव केला. गावातील ज्येष्ठ नागरिक कैलास कुंभार, लोटन बाबुराव कुंभार, लोटन रघुनाथ कुंभार, धुडकू कुंभार, समाधान कुंभार, पंकज पाटील, शत्रुघ्न पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक व मान्यवरांमध्ये अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, राहुल पाटील, सीमा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान छत्रपती शाहू महाराज जयंतीही साजरी करण्यात आली असून युवक कल्याण प्रतिष्ठानतर्फे अनिता संदानशिव यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर व्याख्यान दिले तसेच गीत सादर केले. शाळेतील उपशिक्षक संजय पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातही आजही अनेक विद्यार्थी शाळा, शिक्षक आणि आईवडिलांबद्दल कृतज्ञता जपून समाजात आदर्श निर्माण करत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.



