


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्रकारांना धमकावल्याच्या कथित प्रकरणानंतर खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कळमसरे–मारवड परिसरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून मारवड पोलीस ठाण्यात निवेदन देत तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे पत्रकार वर्तुळात राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पत्रकारांना धमकावल्याच्या आरोपांमुळे कळमसरे, पाडळसरे आणि मारवड परिसरातील पत्रकारांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली. मारवड पोलीस ठाण्यात जमा होत त्यांनी खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी यांना निवेदन देण्यात आले असून, मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या नावानेही निवेदन सादर करण्यात आले आहे. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांशी अशा प्रकारची भाषा वापरणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे नमूद केले.
दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत असून विविध पत्रकार संघटनांनीही खासदार संजय पाटलांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. पत्रकारांवर होणाऱ्या दबाव व धमकीच्या घटनांवर तात्काळ नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कळमसरे–मारवड पत्रकार संघाच्या वतीने यापूर्वीही या विषयावर तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. या संदर्भात अलिबाग येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही निवेदन सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी अंमळनेर 24×7 चे संपादक जेष्ठ पत्रकार डॉ. विलास पाटील, देशदूतचे पत्रकार बाबुलाल पाटील, लोकमतचे पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील, दिव्य मराठीचे प्रा. हिरालाल पाटील, लाईव्ह ट्रेंड्सचे गजानन पाटील, स्वप्नील माळी, शामकांत पाटील यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. सर्वांनी मिळून लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी सन्मानजनक वागणूक ठेवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, पत्रकारांना धमकावणे किंवा अरेरावी करणे ही लोकशाहीविरोधी प्रवृत्ती असून अशा घटनांवर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल.



