Home Cities जळगाव बांभोरी पुलावरून नदीत उडी ; तीन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर, अग्निशमन...

बांभोरी पुलावरून नदीत उडी ; तीन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर, अग्निशमन जवान रवींद्र बोरसे यांचे धाडस

0
109

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बांभोरी पुलावरून नदीच्या पुराच्या पाण्यात उडी मारलेल्या ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह तब्बल तीन तासांच्या शोधमोहीमेनंतर शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी बाहेर काढण्यात आला. पाण्याचा प्रचंड प्रवाह, अंधार आणि १५ फुटांपेक्षा अधिक खोली अशा प्रतिकूल परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता शोधमोहीम राबवली. अखेर जवान रवींद्र बोरसे यांनी पिलरजवळ खोल पाण्यात उतरून मृतदेह बाहेर खेचून आणला.

भिकमचंद नगर परिसरातील जयश्री प्रकाश चौधरी (वय ३५) यांनी शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता बांभोरी पुलावरून नदीपात्रात उडी मारली होती. घटनेची माहिती मिळताच बांभोरी गावातील काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीतील पाण्याची खोली, वेगवान प्रवाह आणि अंधारामुळे शोधमोहीम यशस्वी होऊ शकली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजता उपमहापौर मनोज चौधरी यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी लाईफ गार्ड, लाईफ रिंग आणि बिलायती हुक यांसारख्या आवश्यक साहित्याच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. सकाळी सुमारे ९.३० वाजता शोधमोहीमेला सुरुवात झाली. पुलाच्या पिलरजवळ नदीच्या पाण्याचा वेग मोठा होता. तसेच या ठिकाणी पाण्याची खोली १५ फुटांपेक्षा अधिक असल्याने शोध घेणे आव्हानात्मक ठरत होते. अशा परिस्थितीतही अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उतरून परिसरात शोध घेतला.

सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ११.१० वाजण्याच्या सुमारास जवान रवींद्र बोरसे यांना पुलाच्या पिलरजवळ खोल पाण्यात काहीतरी जाणवले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पाण्यात उतरून बिलायती हुकच्या साहाय्याने मृतदेह बाहेर खेचून आणला. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वाहनचालक देविदास सुरवाडे, तसेच प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, सत्तार तडवी आणि चिराग वाघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शोधमोहीमेदरम्यान त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना आवश्यक सहकार्य केले. याशिवाय वन्यजीव संरक्षण संस्थेच्या शोध पथकानेही पाण्यात उतरून अग्निशमन दलाला मदत केली. या पथकातील गणेश सपकाळे, रवी भोई, नीलेश कोळी, दिनेश सपकाळे, योगेश गालफाडे आणि हेमराज सपकाळे यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.  मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो तातडीने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी जयश्री चौधरी यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound