जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बालगृहातील मुला-मुलींनी आपल्या कल्पकतेतून आणि कलाकौशल्यातून स्वतः तयार केलेल्या आकर्षक आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून मिळणारे उत्पन्न बालगृहातील मुलांच्या आनंदासाठी आणि त्यांना दिवाळीनिमित्त फटाके व नवीन कपडे उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे बालगृहातील मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुला-मुलींचे बालगृह तथा निरीक्षणगृह, जळगाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला. बालगृहातील मुला-मुलींनी स्वतःच्या हातांनी विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदील आणि पणत्या तयार केल्या आहेत. त्यांच्या कल्पकतेला आणि मेहनतीला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच या वस्तूंच्या विक्रीतून मुलांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने प्रदर्शन आणि विक्री स्टॉल उभारण्यात आला आहे.

या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे, बाल निरीक्षणगृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव, उपअधीक्षक दिगंबर पाटील, व्यावसायिक शिक्षिका शोभना डोळे, समुपदेशक प्रशांत रावते उपस्थित होते. तसेच संस्थेचे सहसचिव नितीन इंगळे, सदस्य वासंती चौधरी आणि सदस्य मनीषा पाटील यांचीही उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी मुलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून त्यांच्या कलाकौशल्याचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे मुलांमधील सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना वाढीस लागण्यास मदत होते.
या प्रदर्शनातील आकाशकंदील आणि पणत्यांच्या विक्रीतून मिळणारे संपूर्ण उत्पन्न बाल निरीक्षणगृहातील मुलांच्या दिवाळीच्या आनंदासाठी वापरण्यात येणार आहे. या रकमेतून मुलांना फटाके आणि नवीन कपडे घेऊन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ सजावटीच्या वस्तू खरेदी न करता बालगृहातील मुलांच्या आनंदात सहभागी होण्याची ही एक चांगली संधी आहे. बाल निरीक्षणगृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव यांनी जळगाव शहरातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांना या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. बालगृहातील मुलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या दिवाळीचा आनंद वाढविण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे त्यांनी सांगितले.



