नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथे हिंदू–मुस्लिम एकतेचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या मोफत मेडिकल कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद उर्दू स्कूल क्रमांक १, नाईक वाडा, परकोट मोहल्ला येथे झालेल्या या आरोग्य शिबिरात एकूण १८५ नागरिकांनी प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेतली, तर ९५ नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी १३ जणांनी रक्तदान केले असून, २२ मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात नागरिकांसाठी विविध वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच मोतीबिंदूचे निदान आणि महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे आरोग्य तपासणीपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना या शिबिराचा मोठा फायदा झाला.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपली. आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजात सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात आला.
डॉ. अब्दुल गफ्फार मलिक फाउंडेशन, ताज नगर ग्रुप, नशिराबाद तसेच इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फरहान शेख, साबीर खाटीक आणि सदरु सेठ यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या शिबिराला लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बरकत अली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एजाज मलिक तसेच सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक ठेकेदार यांची उपस्थिती होती.

आरोग्यसेवा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक ठरला. मोफत आरोग्य तपासणीसोबतच २२ मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.



