Home Cities जामनेर टाटा उद्योग समूहाच्या निबंध स्पर्धेत पळासखेडे विद्यालयाची कृतीका राजपूत जिल्ह्यातून प्रथम !

टाटा उद्योग समूहाच्या निबंध स्पर्धेत पळासखेडे विद्यालयाची कृतीका राजपूत जिल्ह्यातून प्रथम !

0
31

शेंदुर्णी -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताला जगातील सर्वात विकसित देश बनवण्यासाठी आपण कोणत्या पाच गोष्टी करणार, या विषयावर टाटा उद्योग समूहाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे (मिराचे) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दोन गटांत आयोजित या स्पर्धेत विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावली. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यात कृतीका निलेश राजपूत या विद्यार्थीनीने विशेष यश संपादन केले आहे.

शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचालित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे (मिराचे) येथे १९ सप्टेंबर २०२६ रोजी ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारताच्या विकासात विद्यार्थ्यांचे योगदान, देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची भूमिका यांचा विचार या स्पर्धेच्या विषयातून मांडण्यात आला. स्पर्धेचे आयोजन दोन गटांत करण्यात आले होते. लहान गटात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा, तर मोठ्या गटात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेतील निबंध तपासणीसाठी टाटा उद्योग समूहाच्या मुंबई येथील कार्यालयात पाठविण्यात आले होते. तेथील परीक्षणानंतर दोन्ही गटांतील विजेत्यांची निवड करण्यात आली.

लहान गटात कु. कृतिका निलेशसिंह राजपूत हिने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. कु. कृतिका ही सामाजिक कार्यकर्ते निलेशसिंग राजपूत यांची कन्या असून तिच्या यशबद्दल समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.दरम्यान, यासोबत, कु. हर्षली प्रवीण पाटील हिने द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक, तर कु. स्नेहल प्रदीप पाटील हिने तृतीय क्रमांकासह कांस्यपदक मिळवले. मोठ्या गटात आदर्श श्रीराम पाटील याने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले. कु. दिव्या निलेशसिंह राजपूत हिने द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक, तर कु. आम्रपाली अनिल गावंडे हिने तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकावले.

या स्पर्धेसाठी विद्यालयाचे शिक्षक तीर्थराज इंगळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. आर. पाटील, पर्यवेक्षक आर. पी. पाटील, ज्येष्ठ शिक्षक एम. एम. पवार,  व्ही. डी. पाटील,  जी. पी. पाटील,  एच. बी. गरुड,  प्रदीप राजपूत,  टी. टी. इंगळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते निलेशसिंह पी. राजपूत, मोहाडी यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली असून, विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या विकासाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.


Protected Content

Play sound