


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका अत्यंत संवेदनशील आणि गंभीर अशा पोक्सो व अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा निकाल आज गुरुवार २५ जून रोजी लागला असून, यामध्ये आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावण्यात आला आहे. चोपडा शहर पोलिसांच्या अचूक तपासामुळे आणि त्यांनी गोळा केलेल्या सबळ पुराव्यांच्या जोरावर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत विनयभंग आणि अत्याचाराची अत्यंत क्लेशदायक घटना घडली होती. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८५/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(२), ३३२(क) तसेच पोक्सो (POCSO) अधिनियम कलम ७, ८ सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम (Atrocity Act) कलम ३(१)(W)(१)(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी सलमान खान अख्तर खान (वय २८ वर्षे, रा. हमीद नगर, चोपडा) याला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा विभाग) श्री. घोलप तसेच श्री. सोनावणे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने व कौशल्याने केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सखोल आणि प्रभावी तपास करून सर्व आवश्यक पुरावे गोळा केले आणि मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६५, १०३(१) तसेच पोक्सो अधिनियम कलम ४, ५, ६ व ५(u) अन्वये गुन्हा सिद्ध झाला.
आज गुरुवार २५ जून रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश क्र. १, अमळनेर यांनी या स्पेशल केस क्रमांक ५०/२०२४ मध्ये महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने आरोपी सलमान खान अख्तर खान याला ५ वर्षे सक्तमजुरी तसेच ५ हजार ५०० रुपये दंड, आणि दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. साक्षीदार न्यायालयात वेळोवेळी हजर राहून त्यांनी प्रभावी साक्ष द्यावी, यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष प्रयत्न केले होते. तसेच, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता के. आर. बागुल यांनी न्यायालयात अतिशय प्रभावीपणे कामकाज पाहून युक्तिवाद केला, ज्यामुळे आरोपीला शिक्षा मिळणे शक्य झाले. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस कटिबद्ध असल्याचे या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, यामुळे समाजाचा कायद्यावरील आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.



