


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्य शासनाने जिल्ह्यासाठी तब्बल १४ कोटी ५० लाख ८९ हजार रुपयांची मदत मंजूर केली असून या निर्णयामुळे हजारो बाधित शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.
राज्य शासनाने २५ जून २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या मदतीमध्ये जळगाव जिल्ह्यातील १४ हजार ३६० बाधित शेतकरी आणि ७ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही शासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा केला.
अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग आणि कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी एकूण १०६ कोटी ५६ लाख ४८ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे.
मंजूर निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा मोठा आधार मिळणार आहे.
याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “अवकाळी पावसामुळे एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मंजूर निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही गतीने करावी.



