



धुळे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर संतप्त ग्राहक व त्याच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील बाळापूर शिवारात घडली. एवढ्यावरच न थांबता एका तंत्रज्ञावर लाकडी दांडक्याने डोक्यावर जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा वार चुकविताना तंत्रज्ञाच्या उजव्या खांद्यावर दांडक्याचा प्रहार झाला आणि त्यात खांद्याला फ्रॅक्चर झाले. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील विविध १४ कलमांन्वये धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणकडून सध्या थकीत वीजबिल वसुलीची विशेष मोहीम सुरू आहे. ४५ दिवसांपासून वीजबिल न भरलेल्या तसेच पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांची यादी वरिष्ठ कार्यालयाकडून क्षेत्रीय पथकांना देण्यात येते. त्यानुसार संबंधित ग्राहकांच्या घरी अथवा व्यावसायिक आस्थापनांवर जाऊन वीजबिल भरण्याबाबत सूचना दिल्या जातात. बिलाचा भरणा न झाल्यास नियमानुसार वीजपुरवठा खंडित करून जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही केली जात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत २ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजेदरम्यान फागणे उपविभागाचे सहायक अभियंता प्रवीण भामरे, आशिष कासार, प्रधान तंत्रज्ञ रविंद्र चौधरी, तंत्रज्ञ चंद्रकांत पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ इंद्रजित नाईक आणि बाह्यस्रोत तंत्रज्ञ रूपेश पाटील हे बाळापूर शिवारातील हॉटेल शांतीसागरजवळ असलेल्या साईसागर ग्रेनाईट मार्बल या व्यावसायिक ठिकाणी थकीत वीजबिल वसुलीसाठी गेले होते. संबंधित ग्राहकाकडे साडेसहा हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल थकबाकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तेथे उपस्थित असलेल्या योगेश नावाच्या व्यक्तीने दुकानाचे मालक सागर पाटील, आकाश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील बाहेर गेल्याचे सांगून त्यांना फोन करून माहिती देतो, ते आल्यानंतर वीजबिल भरतील, असे पथकाला सांगितले. यावर सहायक अभियंता प्रवीण भामरे यांनी कंपनीच्या नियमानुसार जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले. मात्र योगेश याने मालक येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका, अशी भूमिका घेत महावितरणच्या पथकाला कर्तव्य बजावण्यास अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.
यानंतर नियमाप्रमाणे तंत्रज्ञ चंद्रकांत पाटील यांना दुकानाबाहेरील विद्युत खांबावर चढून वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार त्यांनी वीजपुरवठा बंद केला. दरम्यान, महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्यासाठी नियुक्त कंपनीचे प्रतिनिधी अभिषेक पाटील आणि त्यांचे सुपरवायझर विनय ठाकुर हे जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्याच्या तयारीत होते.
याचवेळी दुकानाचे मालक सागर पाटील, आकाश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील हे एका वाहनातून तेथे दाखल झाले. वीजपुरवठा कोणी खंडित केला, अशी विचारणा करत त्यांनी संताप व्यक्त केला. दुकानात असलेल्या योगेशने चंद्रकांत पाटील यांच्याकडे बोट दाखवत त्यांनीच वीजपुरवठा बंद केल्याचे सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
यानंतर सागर पाटील याने योगेश व अन्य व्यक्तीला चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर योगेश आणि लांब बाह्यांचा टी-शर्ट घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांना अर्वाच्य शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्याचवेळी दुकानातील आणखी तीन अनोळखी व्यक्ती तेथे धावत आल्या आणि त्यांनीही हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
या हल्ल्यात दुकानाचे मालक सागर पाटील, आकाश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांची कॉलर पकडून दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, लांब बाह्यांचा टी-शर्ट घातलेल्या अनोळखी व्यक्तीने दुकानाच्या बाजूला पडलेला जाड लाकडी दांडका उचलून चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत वार चुकविला. त्यामुळे दांडक्याचा प्रहार त्यांच्या उजव्या खांद्यावर झाला आणि ते खाली कोसळले.
महावितरणच्या वसुली पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून चंद्रकांत पाटील यांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. त्यांना उपचारासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले.
या घटनेनंतर प्रकरण दडपण्यासाठी किंवा तडजोडीसाठी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदेशीर कारवाईची भूमिका कायम ठेवली. गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांसह सात अभियंते आणि आठ तांत्रिक कर्मचारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात तब्बल पाच तास ठाण मांडून बसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री १२.१६ वाजता एफआयआर दाखल करण्यात आला.
सहायक अभियंता प्रवीण भामरे यांच्या फिर्यादीवरून सागर पाटील, आकाश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, योगेश, एक अनोळखी व्यक्ती तसेच त्यांच्यासोबतच्या आणखी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध संगनमताने शासकीय कामात अडथळा आणणे, महावितरणच्या तंत्रज्ञास शिवीगाळ व धक्काबुक्की करणे, हाताबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण करणे, लाकडी दांडक्याने जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न करणे आणि महावितरणचे पथक पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी आल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 109(1), 132, 121(1), 121(2), 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 351(2), 351(3) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम 37(1), 37(3) आणि 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील आरोपींची भूमिका, हल्ल्याचे स्वरूप आणि इतर संबंधित बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना संरक्षण मिळावे आणि अशा घटनांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही पुढे येत आहे.



