
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका ३५ वर्षीय तरुणावर आलेले जीवघेणे संकट डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे टळले आहे. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुणावर तातडीने शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन देण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असलेले सुरेश (वय ३५) हे पायी जात असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर होती की त्यांचे हात-पाय हलणे बंद झाले होते तसेच ते डोळेदेखील उघडू शकत नव्हते. प्रकृती वेगाने खालावत असल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड आणि त्यांच्या टीमने तातडीने रुग्णाची तपासणी केली. तपासणीदरम्यान रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे आढळून आले. श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना त्वरित व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात आली.
त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी स्कॅन तपासणीत डोक्याच्या कवटीला फ्रॅक्चर (स्कल फ्रॅक्चर) झाल्याचे तसेच मेंदूच्या परायटल भागात एपिड्युरल हेमेटोमा (EDH) म्हणजेच रक्ताची गाठ तयार झाल्याचे निदान झाले. मेंदूवर वाढणाऱ्या दाबामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. विपूल राठोड यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूमधील रक्तस्त्राव थांबवण्यात आला तसेच साचलेले रक्त काढून मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यात आला.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवून विशेष उपचार करण्यात आले. या उपचार प्रक्रियेत डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. प्रितम दास, डॉ. निशा आणि भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे यांनी सहकार्य केले. तसेच आयसीयू विभागातील शालीक चौधरी, नर्सिंग कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण सेवा दिली.डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली असून सध्या तो पूर्णपणे शुद्धीवर आला आहे. रुग्णाची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
डॉ. श्रृती खंडागळे यांनी सांगितले की, “डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर पहिल्या काही तासांतील उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. या रुग्णाच्या सीटी स्कॅनमध्ये एपिड्युरल हेमेटोमा आणि कवटीचे फ्रॅक्चर आढळून आले होते. तातडीने शस्त्रक्रिया केल्यामुळे मेंदूवरील दाब कमी करता आला आणि रुग्णाचा जीव वाचविणे शक्य झाले.”
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू विकार तज्ज्ञांच्या तत्पर निर्णयामुळे आणि अत्याधुनिक उपचार सुविधांमुळे एका तरुणाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले आहे. या यशस्वी उपचारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञता आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.



