Home Cities जळगाव जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी SIR कार्यक्रमास सुरुवात

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी SIR कार्यक्रमास सुरुवात

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम २० जून २०२६ पासून सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून राजकीय पक्षांच्या समन्वयाने कामकाज सुरू करण्यात आले असून, यासाठी विशेष बैठकही आयोजित करण्यात आली.

या अनुषंगाने २२ जून रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार, संगणक चालक नितीन माळी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी राहुल वाघ, पितांबर भावसार, वाय. एस. महाजन, जमील शेख आणि गजानन देशमुख उपस्थित होते. प्रशासन आणि राजकीय पक्षांमध्ये मतदार यादीतील सुधारणा प्रक्रियेवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीदरम्यान मतदार नोंदणी अधिकारी विनय गोसावी यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक स्पष्ट केले. तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, मॅप व अनमॅप मतदारांची पडताळणी करणे आणि डेटा अचूकता सुनिश्चित करणे याबाबत प्रशासनाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

SIR प्रणालीमुळे मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार असून, या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट (BLA) नेमण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाच्या या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, मतदार यादी सुधारणा प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound