Home Cities जळगाव मंत्री  गिरीश महाजन यांची बदनामी ; कारवाईची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

मंत्री  गिरीश महाजन यांची बदनामी ; कारवाईची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

0
55

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री Girish Mahajan यांचे एआय (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर तातडीने सायबर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले आहे.

दि. २१ जून २०२६ रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील दोन दिवसांपासून काही उपद्रवी घटकांकडून व्हॉट्सॲप, फेसबुक तसेच ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गिरीश महाजन यांचे एआयद्वारे तयार केलेले बनावट व मॉर्फ फोटो मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात आहेत. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका जबाबदार कॅबिनेट मंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कृत्य हेतुपुरस्सर आणि राजकीय हेतूने प्रेरित असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, अशा प्रकारच्या कृतींमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याचा धोका निर्माण होत असल्याचेही नमूद केले आहे.

या प्रकरणात संबंधित फोटो तयार करणारे, प्रसारित करणारे तसेच त्यांना लाईक आणि शेअर करणाऱ्या व्यक्तींवर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि सायबर क्राईम कायद्यानुसार तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. डिजिटल माध्यमांवरील गैरवापर रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असेही निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या Bharatiya Janata Party जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे सायबर गुन्हेगारीविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound