रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील रामबाग परिसरात भाजपा नगरसेवक दिलीप पाटील यांच्या घरात झालेल्या धाडसी घरफोडीचा अखेर उलगडा झाला आहे. नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातील चार सराईत चोरट्यांना अटक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्रलंबित गुन्ह्याचा तपास कौशल्याने पूर्ण केल्याने पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या कार्याचे शहरात कौतुक होत आहे.
दि. २० मार्च रोजी रावेर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या तक्रारीनुसार, १८ मार्च रोजी रात्री ते पत्नी व मुलांसह घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू असा सुमारे २ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र आरोपी अत्यंत शिताफीने चोरी करून गेल्याने ते कोणत्याही कॅमेऱ्यात कैद झाले नव्हते. तपासादरम्यान आरोपींनी शहरातील नाल्यांचा वापर करून ये-जा केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच कमी आवाज करणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या कटर मशीनच्या सहाय्याने खिडकीचे गज कापण्यात आल्याचेही निष्पन्न झाले.
पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवली. तपासात मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील एक टोळी अशा प्रकारच्या घरफोड्यांमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नारायणगड पोलिसांनी याच टोळीतील काही आरोपींना दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली आणि तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
या कारवाईत पोलिसांनी गणेशा उर्फ गणपत पिता दितिया (वय २८, रा. रंजीतगड, जि. अलीराजपूर), कैलास पिता दितिया (वय ५०, रा. रंजीतगड, जि. अलीराजपूर), छोटू पिता खेमसिंग (रा. नवली, थाना टांडा, जि. धार) आणि दिनेश लक्ष्मण अनारे (वय २३, रा. भिलवटी, जि. धार) या चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईमुळे रावेर पोलिसांनी प्रलंबित घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तपासातील आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे तसेच गुन्हे शोध पथकातील ईश्वर चव्हाण, समाधान ठाकरे, रोहित महाजन, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील आणि सुकेश तडवी यांनी केली. रावेर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला असून, सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.



