जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक-२०२६ साठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदानासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ६३० मतदार आहेत. यामध्ये ३१५ पुरुष आणि ३१५ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ही मतदान केंद्रे अमळनेर, फैजपूर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, पाचोरा आणि चाळीसगाव या ठिकाणी असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी येताना आवश्यक ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या निवडणुकीत गुलाबी रंगाची मतपत्रिका वापरण्यात येणार आहे. मतदारांनी उमेदवारांच्या नावासमोर आपला पसंतीक्रम अंकात नोंदवायचा आहे. पसंतीक्रम लिहिताना निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचाच वापर करणे बंधनकारक राहणार आहे. शब्दांमध्ये लिहिलेला पसंतीक्रम ग्राह्य धरला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. सात मतदान केंद्रांसाठी सात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानासाठी आवश्यक साहित्य संबंधित मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले आहे. प्रशासनाकडून प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवण्यात येत असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरा आणि पॅन कॅमेरा नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेट्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत. यावेळी उमेदवार आणि त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. निवडणूक आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे तसेच पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, १८ जून रोजी सात मतदान केंद्रांवर ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.



