Home क्रीडा शुबमन गिलने 77 चेंडूत शतक झळकावत मोडले अनेक विक्रम

शुबमन गिलने 77 चेंडूत शतक झळकावत मोडले अनेक विक्रम

0
10

लखनौ -वृत्तसेवा । भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने दमदार फलंदाजी करत शतकी तडका दिला आहे. अवघ्या 77 चेंडूत शतक पूर्ण करत गिलने आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली असून भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्याच्या आक्रमक फलंदाजीचा शानदार अनुभव पाहायला मिळाला.

अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात शुबमन गिलने आपल्या वनडे कारकिर्दीतील नववे शतक झळकावले. पहिल्या वनडे सामन्यात त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले होते. त्यावेळी त्याने 66 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने शतक पूर्ण केले.

शुबमन गिलने 77 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. या शतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या शतकांची संख्या आता 21 झाली आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

कर्णधार म्हणून शुबमन गिलने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वात जलद शतकाची नोंद केली आहे. भारतीय कर्णधार म्हणून सर्वात वेगवान वनडे शतकाचा विक्रम मात्र अद्याप रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने 63 चेंडूत शतक झळकावले होते, तर वीरेंद्र सेहवागने 69 चेंडूत हा पराक्रम केला होता. आता गिलने 77 चेंडूत शतक करत भारतीय कर्णधारांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

शुबमन गिलने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतात सर्वात कमी डावांमध्ये 1000 वनडे धावा पूर्ण करण्याचा विक्रम त्याने मोडला आहे. यापूर्वी विराट कोहली आणि शिखर धवन यांनी भारतात 24 डावांमध्ये 1000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. गिलने हा टप्पा केवळ 19 डावांमध्ये गाठत नवा विक्रम प्रस्थापित केला.

अफगाणिस्तानविरुद्ध वनडेमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही शुबमन गिलने स्थान मिळवले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध इओन मॉर्गनने 2019 मध्ये 57 चेंडूत शतक झळकावले होते. त्यानंतर रोहित शर्माने 2023 मध्ये 63 चेंडूत, इशान किशनने 71 चेंडूत, ग्लेन मॅक्सवेलने 2023 मध्ये 76 चेंडूत आणि आता शुबमन गिलने 77 चेंडूत शतक करत या यादीत स्थान मिळवले आहे.

शुबमन गिलच्या या शतकी खेळीमुळे भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळाली असून कर्णधार म्हणूनही त्याच्या नेतृत्वावर विश्वास वाढला आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमधील नव्या युगाचा प्रमुख चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.


Protected Content

Play sound