
पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत चार दिवस चालणार असून, ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात त्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सोमण यांनी संमेलनाच्या स्थळ आणि तारखांची अधिकृत घोषणा केली. यावेळी संमेलनाचे संयोजक तसेच समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर आदी उपस्थित होते.
महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पुण्यात पार पडली. या बैठकीत शंभराव्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी स्थळ आणि कालावधी निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत सर्व सभासदांनी एकमताने पुणे विद्यापीठ परिसराची निवड केली. यापूर्वी १३ जून रोजी स्थळ निवड समितीने पुण्यातील एस.पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते.
संमेलनासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार बैठकीत करण्यात आला. भव्य आयोजनासाठी प्रशस्त प्रांगण, पार्किंग व्यवस्था तसेच इतर आवश्यक सोयी उपलब्ध असणे गरजेचे आहे. पुणे विद्यापीठ प्रशासनानेही संमेलनासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक आणि कर्मचारी या ऐतिहासिक संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसावी यांनी दिल्याचे योगेश सोमण यांनी सांगितले.
या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रविवारी झालेल्या बैठकीला ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.
दरम्यान, शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी म्हणून राज्यभर विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे आणि मुंबई वगळता ज्या ४८ ठिकाणी यापूर्वी साहित्य संमेलने झाली आहेत, त्या ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये संमेलनपूर्व ९९ साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. हे उपक्रम १५ ऑगस्ट २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहेत. मराठी साहित्य चळवळीच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, शंभरावे साहित्य संमेलन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा भव्य उत्सव ठरणार आहे.



