Home मनोरंजन निवेदिता सराफ यांच्या ‘या’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एन्ट्री 

निवेदिता सराफ यांच्या ‘या’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एन्ट्री 

0
8


मुंबई-वृत्तसेवा । मराठी टेलिव्हिजन विश्वात नव्या कथानकांसह अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या मध्यवर्ती भूमिकेने सजलेली ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवीन मालिका लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून तरुण अभिनेता साईदत्त बाली याला झी मराठीच्या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली असून तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत साईदत्त बाली कृष्णाईच्या सावत्र लेकाची म्हणजेच ‘जीत’ या व्यक्तिरेखेची भूमिका साकारत आहे. मालिकेत कृष्णाईच्या मध्यवर्ती भूमिकेत निवेदिता सराफ असून अभिनेत्री साक्षी गांधी साईदत्तच्या सख्ख्या आईची तर अभिनेते संजय कुलकर्णी त्याच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी एवढ्या अनुभवी आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने साईदत्त या अनुभवामुळे भारावून गेला आहे. या भूमिकेबद्दल भावना व्यक्त करताना साईदत्त म्हणाला की, “ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आणि महत्त्वाची आहे. झी मराठीसारख्या लोकप्रिय वाहिनीवर काम करण्याची पहिली संधी मिळणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.” यापूर्वी साईदत्तने कारण गुन्ह्याला माफी नाही, अबोली, बाळूमामाच्या नावानं चांगभलं आणि संसार माझा रेखिते यांसारख्या मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

‘कृष्णाईच्या लेकी’साठी ऑडिशनची संधी मिळाली आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली, असे साईदत्तने सांगितले. जीत या व्यक्तिरेखेची संकल्पना आणि ती साकारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन अभिनेत्री व टीमकडून मिळाल्याचेही त्याने नमूद केले. ही ऑडिशन आव्हानात्मक होती, मात्र त्यातून अभिनयाच्या अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, असे त्याने सांगितले.

साईदत्त बाली हा मूळचा मुंबईतील प्रभादेवी परिसरातील असून लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. दादर येथील कीर्ती कॉलेजने त्याच्या कलागुणांना योग्य दिशा दिली. लहान वयातच अभिनेते नाना पाटेकर यांच्या अभिनयशैलीचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांच्या संवादफेकीची आणि आवाजाची नक्कल करताना त्याच्यातील मिमिक्री कलाकार घडत गेला. पुढे त्याने अनेक नामवंत कलाकारांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्याची कला आत्मसात केली. साईदत्तच्या या कलाप्रवासात त्याच्या आईचा मोठा वाटा आहे. तिने त्याच्यातील प्रतिभेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रोत्साहन दिले. एकांकिका, एकपात्री प्रयोग आणि नाटकांमधून अभिनयाचा अनुभव घेत साईदत्तने टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवले. अभिनयासोबतच शिक्षणाकडेही त्याने दुर्लक्ष केले नाही. तो सध्या दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून शूटिंग आणि अभ्यास यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे.

या प्रवासात अभिनेते रोहित परशुराम यांनी त्याला अभिनयातील बारकावे समजावून सांगितले. तसेच दिग्दर्शक अनिकेत साने, विशाल कुंभार आणि अमित पारकर यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे सुरुवातीचे दडपण कमी झाले आणि नवीन गोष्टी शिकण्याचा आत्मविश्वास वाढला, असे साईदत्तने सांगितले. कॉलेजचे शिक्षण आणि अभिनयाचे प्रशिक्षण यांचा समतोल राखत साईदत्त बाली आता मनोरंजन क्षेत्रातील नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. आईचे प्रोत्साहन आणि शिक्षणातून मिळालेला आत्मविश्वास सोबत घेऊन तो अभिनयाच्या क्षेत्रात मोठा प्रवास करण्यासाठी सज्ज झाला आहे.


Protected Content

Play sound