Home Cities जळगाव नशिराबाद आठवडे बाजार वसुलीत गैरव्यवहाराचा आरोप ; कारवाईची मागणी 

नशिराबाद आठवडे बाजार वसुलीत गैरव्यवहाराचा आरोप ; कारवाईची मागणी 

0
16

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद नगरपरिषदेच्या आठवडे बाजारातील वसुली प्रक्रियेत गंभीर आर्थिक अनियमितता होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते भूषण भानुदास कोल्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. व्यापारी व विक्रेत्यांकडून शुल्क वसूल करताना अधिकृत पावत्या दिल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित कर्मचारी तसेच मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दि. 26 मे 2026 रोजी सहाय्यक आयुक्त, नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नशिराबाद नगरपरिषदेमार्फत आठवडे बाजारामध्ये व्यापारी व विक्रेत्यांकडून विविध प्रकारचे शुल्क, जागा भाडे व बाजार वसुली केली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र ही वसुली करताना नगरपरिषदेची अधिकृत पावती, मशीन पावती किंवा कोणत्याही प्रकारची लेखी पावती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पावतीशिवाय सुरू असलेल्या वसुलीमुळे नगरपरिषदेच्या महसुलात आर्थिक अनियमितता, महसूल अपहार आणि भ्रष्टाचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित कर्मचारी खुलेपणाने पावती न देता वसुली करत असतानाही मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक यंत्रणाही राबविण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भूषण कोल्हे यांनी आपल्या तक्रारीत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील विविध तरतुदींचा उल्लेख केला आहे. अधिनियमातील कलम 77 नुसार मुख्याधिकाऱ्यांवर नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, खात्यांची देखरेख करणे, आर्थिक अनियमितता रोखणे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कलम 78(C) नुसार कर्तव्यात निष्काळजीपणा किंवा कर्तव्यच्युती करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

निवेदनात अधिनियमातील कलम 79 चा उल्लेख करत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तंबी, वेतनवाढ रोखणे, आर्थिक नुकसान वसूल करणे, निलंबन, सेवेतून काढून टाकणे किंवा बडतर्फी यांसारख्या कारवाईची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित कर्मचारी आणि मुख्याधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.तक्रारीत नशिराबाद नगरपरिषदेच्या आठवडे बाजार वसुलीची स्वतंत्र चौकशी, पावती न देता वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई, मुख्याधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधिनियमातील संबंधित कलमान्वये कारवाई, बाजार वसुलीचे विशेष लेखापरीक्षण, वसुली रजिस्टर, पावती पुस्तके, जमा रक्कम व बँक नोंदींची तपासणी तसेच आर्थिक नुकसान झाल्यास त्याची वसुली करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय भविष्यात सर्व बाजार वसुली अधिकृत पावतीद्वारेच करण्याचे आदेश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सदर तक्रारीवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास विभागीय आयुक्त तसेच महाराष्ट्र नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या तक्रारीमुळे नशिराबाद नगरपरिषदेच्या आर्थिक कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. नशिराबाद आठवडे बाजारातील वसुली प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या या गंभीर तक्रारीमुळे नगरपरिषदेच्या आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound