Home Cities जळगाव जळगावातील ‘या’ गंभीर वीज समस्यांवर उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती आक्रमक; दिले...

जळगावातील ‘या’ गंभीर वीज समस्यांवर उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती आक्रमक; दिले मोठे आदेश!

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील विजेच्या विविध गंभीर समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहरात रात्रीच्या वेळी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, दिवसा सुरू राहणारे स्ट्रीट लाईट आणि धोकादायक ठरणाऱ्या वीज वाहिन्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका व महावितरण (MSEB) अधिकाऱ्यांची एक अत्यंत महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शहरातील विविध भागांतील विजेच्या विस्कळीत कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचे कडक निर्देश दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला लोकप्रतिनिधींच्या वतीने उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, राहुल पाटील आणि गजानन मामा देशमुख उपस्थित होते. तर महावितरणच्या (MSEB) वतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे व सहाय्यक अभियंता निलेश कुरसंगे आणि जळगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून प्रमुख मोरे साहेब व कनिष्ठ अभियंता सुमित पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच लोकप्रतिनिधींनी जळगावकरांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. शहरात रात्रीच्या वेळी वारंवार वीज खंडित होण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांची झोप उडाली असून, यावर महावितरणचे कसलेही नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

बैठकीत शहरातील स्ट्रीट लाईटच्या विस्कळीत नियोजनावरही मोठी चर्चा झाली. रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील दिवे बंद असतात, ज्यामुळे गुन्हेगारी आणि अपघातांचा धोका वाढतो; तर याउलट दिवसा मात्र हे स्ट्रीट लाईट सुरूच राहतात, या अजब कारभारावर लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. यासोबतच शहरातील अनेक मुख्य रस्ते आणि अंतर्गत गल्ल्यांमध्ये विजेच्या केबल्स अतिशय धोकादायक पद्धतीने लोमकळत असून अनेक भागांतील ट्रान्सफॉर्मरच्या पेट्यांवर झाकण नसल्याने उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे मोठ्या अपघाताची टांगती तलवार नागरिकांवर आहे, ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच शहरातील अनेक अंतर्गत व मुख्य रस्त्यांच्या, विशेषतः सर्विस रोडच्या अगदी मधोमध महावितरणचे खांब (पोल) उभे असल्याने दैनंदिन वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून हे खांब बाजूला हटवण्याची मागणी करण्यात आली.

या संयुक्त बैठकीत प्रामुख्याने नेमखेडी सबस्टेशनमधील अडचणींवर विशेष लक्ष वेधण्यात आले. नेमखेडी परिसरात विजेचा त्रास सर्वाधिक असून, तिथे तांत्रिक कामे करण्यासाठी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ (स्टाफ) उपलब्ध नसल्याने कामांचा बोजवारा उडाला असल्याचे स्पष्ट झाले. सर्वात गंभीर बाब म्हणजे, शहरातील वीज खंडित झाल्यावर नागरिक जेव्हा तक्रार निवारण केंद्रांना किंवा सबस्टेशनला फोन करतात, तेव्हा अनेकदा फोन व्यस्त येतो किंवा कर्मचारी फोन उचलत नाहीत. या उदासीन आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. या सर्व गंभीर समस्या ऐकून घेतल्यानंतर उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींनी महावितरण व मनपाच्या विद्युत विभागाला तातडीने संयुक्त मोहीम राबवून सर्व त्रुटी दूर करण्याचे आणि लवकरात लवकर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे कडक आदेश दिले आहेत.


Protected Content

Play sound