
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेने अतिक्रमणाविरोधातील कारवाईला अधिक गती देत रामानंद नगर परिसरातील मनपाच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली. आज रामानंद नगर येथील १२४ खोल्यांसमोरील जागेवर असलेल्या तब्बल २५ अनधिकृत दुकानांसह एका सट्टा पिढीवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळपासूनच संबंधित ठिकाणी पथकासह धडक देत कारवाई सुरू केली. मनपाच्या खुल्या भूखंडावर परवानगीशिवाय उभारण्यात आलेली दुकाने हटविण्यात आली. अनेक वर्षांपासून या जागेवर अनधिकृतरित्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान एक सट्टा पिढीही बंद करण्यात आली. तसेच दुकानांमधील विविध साहित्य, फर्निचर व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सुमारे २७ कॅरेट इतका माल जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी तीन पेलोड वाहने, दोन काटे तसेच दोन ऑटो रिक्षांचा वापर करण्यात आला. जप्त करण्यात आलेला माल महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांच्या पथकाने केली.
शहरातील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवून नागरिकांसाठी उपलब्ध जागा मोकळी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असून आगामी काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.



