
फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून झालेल्या नैसर्गिक वादळी वाऱ्यामुळे लोहारा येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने फैजपूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी नगराध्यक्षा सौ. दामिनीताई सराफ यांनी तातडीने पुढाकार घेत संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत कार्यवाही सुरू केली.

नगराध्यक्षा दामिनीताई सराफ यांनी फैजपूर ते लोहारा दरम्यान बंद पडलेले सुमारे 20 एअरव्हॉल त्वरित बदलण्याचे निर्देश दिले. या कामामुळे जलवाहिनीतील अडकलेली हवा बाहेर पडून पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नियमित व अखंडित पाणीपुरवठा करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, लोहारा येथील वीजपुरवठा पुढील काही दिवस खंडित राहिल्यास खिरोदा ते लोहारा मार्गावरील सर्व बंद एअरव्हॉल बदलण्याचे कामही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यवाहीदरम्यान उपनगराध्यक्षा निकिताताई कोळी यांच्या वतीने नगरसेवक चंदू कोळी, सुरज गाजरे, सागर होले, पवन सराफ, राहुल गुजराथी, आवेश भांजा, युनूसभाई मोमीन (गबलूभाई) तसेच नगरपालिका कर्मचारी नदीम खान, अमोल सराफ, किशोर वडर, अमोल जावळे, जयेश सोनार, तुषार पाटील, चंदू कुरहाडे आणि वैभव चौधरी उपस्थित होते. यांच्यासह राकेश सराफ, भूषण गलवाडे, अक्षय फेगडे व येजासभाई यांनीही सहकार्य केले.
नगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या या तातडीच्या कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.



