
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बौद्ध समाजातील विवाह सोहळे नियोजित वेळेपेक्षा अनेक तास उशिराने सुरू होण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा, मुक्ताईनगर शाखेने अनोखा उपक्रम राबवला आहे. सावदा येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात लग्न विधी तब्बल चार तास उशिराने सुरू झाल्याने वधू-वर पक्षाकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सावदा येथे दिवंगत किशोर तुकाराम तायडे यांची कन्या दीक्षा (रा. नरवेल, ता. मुक्ताईनगर) आणि बापू शेजवळ (रा. दहिगाव संत, ता. पाचोरा) यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. विवाहपत्रिकेत नमूद केलेल्या वेळेपेक्षा जवळपास चार तास उशिराने विधी सुरू झाल्याचे निदर्शनास आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे अध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा हिशोब तपासणीस पंडित सपकाळे, तालुका संघटक संजय म्हसाने, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर तसेच बौद्धाचार्य पी. के. महाले व एस. एस. तायडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. नितीन त्र्यंबक तायडे व शैलेश श्रावण तायडे यांनी दंड वसूल करण्याबाबत पुढाकार घेतला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विवाह सोहळे अनावश्यकपणे विलंबाने सुरू होणे सामाजिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगत प्रबोधन केले. समाजाने वेळेचे महत्त्व ओळखून विवाह विधी नियोजित वेळेत पार पाडावेत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिस्त, समता आणि सामाजिक सुधारणांच्या विचारांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामुळे भविष्यात बौद्ध समाजातील विवाह सोहळे वेळेवर सुरू होण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



