Home Cities जळगाव अल नीनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा 

अल नीनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा 

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येत्या खरीप हंगामात संभाव्य ‘अल नीनो’च्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या हवामानातील अनिश्चिततेचा विचार करून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी आणि बदलत्या हवामान परिस्थितीत पिकांचे संरक्षण तसेच उत्पादनवाढीसाठी ‘ब्रॉड बेड फरो (बीबीएफ)’ तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे आयोजित ‘शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, आत्मा जळगाव आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक व वैज्ञानिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी घुगे यांनी नैसर्गिक शेती, मातीचे आरोग्य जपणे आणि खतांचा संतुलित वापर यावर विशेष भर दिला. अल्प पाऊस किंवा अतिवृष्टी अशा दोन्ही परिस्थितींमध्ये पिकांचे संरक्षण करण्यासाठी बीबीएफ तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बदलत्या हवामानाशी जुळवून घेत शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. जमिनीच्या गरजेनुसारच खतांचा वापर करावा आणि पहिल्या पावसानंतर तातडीने पेरणी करण्याऐवजी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी आणि डॉ. शरद जाधव यांनी बीबीएफ यंत्राद्वारे पिक व खत पेरणी तसेच टोकण यंत्राद्वारे पेरणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. या तंत्रज्ञानामुळे बियाणे आणि खतांची बचत, जमिनीतील ओलावा संवर्धन तसेच उत्पादनवाढ कशी साधता येते, याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत बीबीएफ यंत्राद्वारे सरी-वरंबा पद्धतीची पेरणी करून दाखविली. तसेच महिला शेतकरी आणि शेतमजुरांचे श्रम कमी करण्यासाठी टोकण यंत्राचा प्रभावी वापर कसा होऊ शकतो, याबाबतही त्यांनी माहिती घेतली. बीबीएफ तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या मनोज चौधरी (ममुराबाद), हितेंद्र महाजन (म्हसावद), राजेंद्र पाटील (पिचर्डे) आणि सुनील बोरसे (चोपडा) या प्रगतशील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी, शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक दहात, डॉ. सुमेरसिंग राजपूत, डॉ. गिरीश चौधरी, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) भरत इंगळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, दीपक साळुंखे, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. शरद जाधव, किरण जाधव, तुषार गोरे, किरण मांडोळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महिला शेतकरी, कृषी सखी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


Protected Content

Play sound