
पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजिंगमध्ये २५ वर्षीय रविंद्र मोरे (कोळी) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गुरुवारी पाचोरा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. रविंद्र याचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत आप्तेष्ट, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पोलिसांनी संशयितांवर तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घ्यावे, या मागणीसाठी आंदोलन तीव्र झाले असून पाचोऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

२८ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास जळगाव रोडवरील एका लॉजिंगमध्ये रविंद्र मोरे यांचा गळफास लागलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र आक्रोश करत हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला. रविंद्र हा आत्महत्येसारखे पाऊल उचलणारा नव्हता, त्याचा घातपात झाला असावा, अशी भूमिका कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच घेतली आहे.
बुधवारी रात्री उशिरापर्यंत पाचोरा पोलीस ठाण्यासमोर आणि ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांनी पोलिसांसमोर तीव्र संताप व्यक्त करत संबंधित संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, पुढील तपासासाठी रविंद्र यांचा मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात इन-कॅमेरा पंचनाम्यासाठी नेण्यात आला. त्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात काही बाबी संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे गुरुवारी सकाळपासून वातावरण अधिकच तापले.
२९ मे रोजी सकाळी मोठ्या प्रमाणात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पाचोरा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. पोलिसांसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी मृत्यूच्या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. रविंद्रचा मृतदेह पुन्हा पाचोरा पोलीस ठाण्यात आणण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आंदोलन आणखी तीव्र झाले. पोलिस प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू असून परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.



