
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका शेतमजुराच्या कुटुंबावर लाठ्या-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी शेतमजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सबगव्हाण येथील रहिवासी असलेले ५३ वर्षीय शेतमजूर रवींद्र शांताराम पाटील हे २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात असताना, गावातीलच संशयित आरोपी मनोहर रोहिदास पाटील, त्यांचा मुलगा रोहित मनोहर पाटील आणि ललिता मनोहर पाटील यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रवींद्र पाटील, त्यांची पत्नी आणि मुलाने याचा जाब विचारला असता, आरोपींनी त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा वाद सोडवण्यासाठी रवींद्र पाटील पुढे सरसावले असता, संशयित आरोपी मनोहर पाटील याने हातातील काठीने थेट त्यांच्या डोक्याच्या मध्यभागावर जोरदार प्रहार केला. यामुळे रवींद्र पाटील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे मुलगे निलेश आणि सागर धावून आले असता, रोहित आणि मनोहर पाटील यांनी त्यांनाही लाठ्या-काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी बेदम चोप दिला. हा वाद आणि आरडाओरड ऐकून गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करून भांडण सोडवले आणि पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोहेकॉ संजय सूर्यवंशी हे पुढील तपास करीत आहे.



