
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन अट्टल वाहनचोरांना अटक केली आहे. या आरोपींकडून विविध कंपन्यांच्या एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल १ लाख ८७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संतोष रणछोड सैंदाणे (वय ४७, रा. वाघनगर, जळगाव) यांची होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक MH 19 CL 7558 ही सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने विशेष पथक स्थापन करून चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळासह जळगाव शहरातील विविध भागांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ‘नेत्रम’ कार्यालयातील पोलीस कर्मचारी मुबारक देशमुख यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
तपासादरम्यान महेंद्र गोपाल चव्हाण (वय २३, रा. खोटेनगर, जळगाव) आणि मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केली असता आरोपींनी दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपी क्रमांक १ कडून एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ५० हजार रुपये किंमतीची होंडा शाईन, ५२ हजार रुपये किंमतीची टीव्हीएस वेगो मोपेड, ५० हजार रुपये किंमतीची हिरो डिलक्स आणि ३५ हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर या वाहनांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.



