Home आरोग्य जिल्ह्यात २८ जून रोजी ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देणार

जिल्ह्यात २८ जून रोजी ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देणार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार येत्या २८ जून २०२६ रोजी देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यातही या मोहिमेसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून यासाठी आरोग्य विभागाकडून सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, डीन डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मोहिमेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ग्रामीण, शहरी आणि महानगरपालिका क्षेत्र मिळून एकूण ४ लाख ७ हजार ९७८ बालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरात ३ हजार १५० पोलिओ बूथ उभारण्यात येणार असून २ हजार ९२६ आयपीपीआय टीम, ६४९ मोबाईल टीम आणि १३१ ट्रान्झिट टीम कार्यरत राहणार आहेत.

पोलिओ मोहिमेच्या दिवशी सर्व बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. त्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस आरोग्य पथके घरोघरी जाऊन राहिलेल्या बालकांना डोस देणार आहेत. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

भारताने पोलिओ निर्मूलनाच्या दिशेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांचाही यावेळी उल्लेख करण्यात आला. सन १९९५ पासून सातत्याने पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आल्यामुळे १३ जानेवारी २०११ नंतर देशात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. या यशस्वी मोहिमेमुळे मार्च २०१४ मध्ये भारताला अधिकृतपणे पोलिओमुक्त देशाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते.

जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी पालकांना आवाहन करत पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यासाठी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. “पोलिओमुक्त जिल्हा कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाची जबाबदारी महत्त्वाची आहे,” असे त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound