
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तळले कॉलनी परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात ‘संगीतमय श्रीमद भागवत कथे’चे आयोजन करण्यात आले आहे. अधिक ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या या सात दिवसीय भागवत कथा सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिवंगत कै. रूपचंद चावदस चौधरी, कै. सौ. सुनंदा कैलास चौधरी आणि कै. कुंदन सुधीर चौधरी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कैलास रूपचंद चौधरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भागवत कथा सोहळ्याचे आयोजन तळले कॉलनी, जुना खेडी रोड, जळगाव येथे करण्यात आले आहे. धार्मिक परंपरा आणि अध्यात्मिक संस्कार जोपासण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होत असून परिसरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
या भागवत कथेचे प्रवक्ते ह.भ.प. मंगेश महाराज वराडे दाताळकर हे करणार आहेत. त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे आणि प्रभावी निरूपण शैलीमुळे भागवत कथा रसिकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. दररोज दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत कथा होणार असून सकाळी आणि सायंकाळी काकड आरती व हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात 17 मे पासून झाली असून समारोप 24 मे 2026 रोजी होणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 मे रोजी सायंकाळी 4 वाजता दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला असून 24 मे रोजी सकाळी 9 वाजता कालयाचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी जळगावातील विविध मित्र मंडळे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभत आहे. जळगाव मित्र मंडळ, तरुण कुणबी मित्र मंडळ तसेच तळले कॉलनी मित्र मंडळ यांच्याकडून कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
दरम्यान, या भागवत कथा सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



