
जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिला व बाल विकास विभागाच्या मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकावर जातीय अपमान, धमकी आणि पदाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप करण्यात आल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव दक्षिण येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. आर. तडवी यांनी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेकडे लेखी तक्रार सादर करत स्वीय सहाय्यक राजेश गायकवाड यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

आर. आर. तडवी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सन 2021 मधील सर्वसाधारण बदली प्रक्रियेदरम्यान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव हे पद रिक्त असतानाही त्यांना त्या पदावर नियुक्त न करता हेतुपुरस्सर बदली करण्यात आली. आपण तडवी भिल्ल या आदिवासी समाजातील असल्यामुळे अपमानित करण्याच्या उद्देशानेच बीड येथे बदली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, सन 2024 मधील सर्वसाधारण बदल्यांच्या वेळी देखील जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) जिल्हा परिषद, जळगाव हे पद रिक्त असतानाही त्यांना डावलण्यात आले. आपल्या विनंती अर्जाची दखल न घेता स्वतःपेक्षा दहा वर्षे कनिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जातीय कारणातून वारंवार अन्याय आणि अपमान करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
आर. आर. तडवी यांनी आपल्या निवेदनात असा गंभीर आरोप केला आहे की, बदलीसाठी मंत्रालयात वेळोवेळी भेट घेतल्यानंतर राजेश गायकवाड यांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला. याशिवाय “गुपचूप नोकरी कर, नाहीतर तात्काळ निलंबित करीन” अशा प्रकारे दबाव टाकल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. जातीय स्वरूपाच्या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून संबंधित तक्रारीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होऊ लागली आहे.
दरम्यान, तक्रारीत नमूद करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी अधिकारी संघटनांकडून केली जात आहे. या प्रकरणात शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.



